सरांचा शेवगा पुस्तकातून लागवडीची प्रेरणा
पूर्ण दुर्लक्ष होऊनही शेवग्याने दिली साथ

श्री. राहूल चंद्रकांत शहा, मु.पो. पाचुंब्री, ता. शिराळा, जि. सांगली. (०२३४५) २२७५४४

आमच्या गावाचे सवाखंडे साहेब हे आपली टेक्नॉंलॉजी वापरत असून 'कृषी विज्ञान' मासिकाचे वाचक आहेत. त्यांच्याकडे डॉ. बावसकर टेक्नॉंलॉजीचे शेवगा पुस्तक मला वाचण्यास मिळाले. त्यातील माहिती, शेतकर्‍यांचे अनुभेव वाचले. त्यातून शेवगा लागवडीची प्रेरणा मिळाली.

'सिद्धीविनायक' शेवग्याचे जून २००९ मध्ये ७ पाकिटे बी घेऊन गेलो. त्यावेळी ३० गुंठे सोयाबीन पेरला होता. तर या सोयाबीनमध्येच जुलै महिन्यात ९ x ५ वर शेवग्याचे बी टोकले. त्यावेळी सोयाबीन १ महिन्याचे होते, तर ७०० पैकी ५०० झाडे जगली. आमच्या घरगुती अडचणीमुळे गेल्यावर्षी शेतीकडे दुर्लक्ष झाले. या शेवग्याला एकही फवारणी केली नाही. फक्त शेंडा एकदा खुडला होता.

सोयाबीन ८ क्विंटल निघाला. शेवगा आता २ महिने झाले शेंगा तोडत आहे. पावसाळा संपल्यानंतर एकही पाणी देऊ शकलो नाही. शेती पूर्ण पावसावरच अवलंबून असते. जमीन मुरमाची आहे, तरीही झाडे हिरवीगार आहेत. पानांवर काळोखी आहे. फुलकळी भरपूर लागत आहे, पण पाणी नसल्याने गळत आहे. त्यामुळे ४० - ५० च शेंगा एका झाडावरून मिळत आहेत.

'सिद्धीविनायक' शेवगा इतर शेवग्यापेक्षा सरसच

त्याचवेळी मी 'सिद्धीविनायक' शेवग्याचे एक पाकीट बी गावातील श्री. प्रल्हाद माने यांच्यासाठी नेले होते आणि त्यांनी स्थानिक १०० बी असे २०० बी लावले. त्याचे रोपे तयार झाल्यावर मध्यम प्रतीच्या जमिनीत लागवड केली. पाण्याचे दुर्भिक्ष असतानाही बोअरच्या कमी पाण्यावर त्यांनी काटकसरीने झाडे जोपासली. त्यातील १८० झाडे तयार आहेत. त्यांनी सर्व वापर केला. दोन्ही प्लॉट वेगवेगळे आहेत, तर 'सिद्धीविनायक' शेवग्याच्या ३ - ४ महिन्यापासून शेंगा चालू आहेत. झाडाला १०० - १५० शेंगा आहेत. शेंगा हिरव्यागार एकसारख्या असल्याने गावातच ६० - ६५ रू. किलो भावाने विकतात. अर्ध्या तासात दररोज ३० - ४० किलो माल खपतो.

या आमच्या दोघांच्या अनुभवावरून चालू वर्षी मी पुन्हा 'सिद्धीविनायक' शेवग्याची १० पाकिटे बी घेऊन जात आहे. आमच्याकडे ५ - ६ महिन्याचे पावसाळ्यातील पीक निघल्यावर शेती रिकामी राहते तेव्हा सरांनी जरी सांगितले असले शेवग्याचे दोन बहार वर्षातून मिळतात. तेथे आम्हांला पावसाळ्यातील एक बहर मिळाला तरी पुष्कळ आहे. ९ फुट ओळीमध्ये रोटर (ट्रॅक्टर) चालवतो. यात सोयाबीन, भुईमूग, मका अशी आंतरपिके घेता येतात. पावसाळयानंतर कोणतेच पीक घेता येत नसल्याने शेवग्याच्या एका झाडापासून २० - २५ जरी शेंगा मिळाल्या तरी उत्पन्नात भरच पडते, म्हणून सरांच्या सल्ल्यानुसार हा दुसरा शेवग्याचा प्लॉट पुर्ण नियोजनाने करणार आहे. 'कृषी विज्ञान' मासिकाची वर्गणी भरून अंक चालू केला.

मित्राने लावलेल्या स्थानिक जातीच्या झाडांवर शेंगा 'सिद्धीविनायक' शेवगाच्या तुलनेत फार आहेत, तेव्हा तो प्लॉट ते काढून टाकणार आहेत.

ते बोअरचे पाणी पाईपने प्रत्येक झाडास १० - १२ लि. याप्रमाणे आळ्यामध्ये देऊन कमी पाण्यावर हा 'सिद्धीविनायक' शेवगा यशस्वीरित्या उत्पादन देत आहे.

New Articles
more...