'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवगा लंडन व कुवेतला निर्यात
श्री. केदा यु. सोनवणे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक), मु. पो. सटाणा, ता. सटाणा, जि. नाशिक. मो. ८८०५७७१९७१
१६ ऑगस्ट २०१० ला अडीच एकरात (१ हेक्टर) मोरिंगा शेवग्याची लागवड १२' x ८' वर केली आहे.
'सिद्धीविनायक' शेवगा लागवडीची माहिती श्री. संतोष ढगे यांनी सांगितली. त्या माहितीच्या आधारे डॉ.बावसकर तंत्रज्ञानाने पिशव्या तयार करून शेवग्याचे बी जर्मिनेटर मध्ये भिजवून लावले. त्यामुळे बियांची उगवणा चांगली झाली. महिन्याभरात रोपे लागवडीस तयार झाली. नंतर कल्पतरू खत देवून रोपांची लागवड केली. १५ दिवस ते १ महिन्याच्या अंतराने दोन ते तीन वेळा सप्तामृतची फवारणी केली. त्यामुळे झाडांची वाढ चागली झाली. सन २०१०- २०११ या वर्षामध्ये पाऊस अल्प प्रमाणात पडला. विहिरींनी तळ गाठला. अशा परिस्थितीत ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देवून शेवगा जगवला. ७ व्या महिन्यात शेंगा येण्यास सुरुवात झाली. एका झाडास २५० ते ३०० शेंगा होत्या. मालेगाव (जि.नाशिक) मार्केटला प्रथम रू. ८ पासून रू. २५/ - पर्यंत भाव मिळत होता.
आता सध्या माल चालू असून बदलत्या वातावरणानुसार जर्मिनेटर, थ्राईवर, प्रोटेक्टंटच्या फवारण्या घेत आहे, शेंगा २।। ते ३ लांबीच्या मिळत आहेत. निवडक माल वाशी मार्केटमधून एक्स्पोर्ट होत आहे. मे - जून २०११ मध्ये शेंगा चालू झाल्या. सुरूवातीस आठवड्याला ३०० किलो माल पावसाळयामध्ये निघत होता. त्यानंतर डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीच्या सप्तामृताच्या फवारण्या चालू केल्या, तसेच ऑक्टोबर महिन्यात तापमान ४० - ४३ डी. से. पर्यंत वाढल्याने शेंगा लवकर पोसून ३ -४ थ्या दिवशी शेंगा काढणीस येवू लागल्या. त्यामुळे आठवड्याला १ ते १। टन शेंगा तोड्याला निघू लागल्या. यातील ८० ते ९०% शेंगा ह्या जागेवरून ५४ रू./किलो दराने वाशीचे व्यापारी निर्यातीसाठी जागेवरून निवडून नेत असे. उरलेला (निर्यातीमध्ये नाकारलेला) १०% माल आमच्यापासून ३० किमी अंतरवार मालेगाव मार्केटला नेतो.
तर तेथे सुरुवातीस मार्केटमध्ये आलेल्या इतरांच्या शेंगापेक्षा कलर कमी असल्याने भाव २- ३ रू. किलोला कमी मिळत असे, परंतु नंतर मोरिंगा शेवग्याच्या भाजीची चव गिऱ्हाईकांनी चाखल्यानंतर पुढे कलर जरी इतरांपेक्षा थोडा कमी असला तरी त्यांच्यापेक्षा ५ - ६ रू. / किलोला भाव जादा मिळू लागला.
आतापर्यंत ५ ते ६ टन शेवगा एक्सपोर्ट झाला आहे. एकदा कुवेतला गेला आहे आणि बाकी सर्व लंडनला एक्स्पोर्ट झाला. (संदर्भासाठी कव्हरवरील फोटो पहावा.)
दवामुळे शेंगांवर पडणारा लाल ठिपका सप्तामृतामुळे निघून जातो
सध्या आमच्या भागात थंडी खूप आहे. ढगाळ वातावरण आहे. तापमान ६ ते ४ डी. से. पर्यंत खाली आले. असल्याने शेंगा पोसण्यास वेळ लागतो. तसेच हिवाळ्यात शेंगावर दव पडले की तो दुपारच्या उन्हाने जागेवर वाळून तेथे लाल ठिपका पडतो. त्याचे प्रमाण वाढले कि शेंगाचा बराचसा भाग हा लालसर होतो, मात्र यावरही आम्हाला सप्तामृत फवारणीनंतर असा अनुभव आला की, शेंगेवर पडलेले दव लगेच सटकते. त्यामुळे तेथे लाल ठिपक पडत नाही, तर ती हिरवीगार होऊन शेंगांची व्कॉलिटीही सुधारते.
२।। एकरास डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचा खर्च १५ -१६ हजार, उत्पन्न ५।। लाख
डॉ.बावसकर टेक्नॉंलॉजीचे आतापर्यंत १३ ते १४ स्प्रे घेतले आहेत. पावसाळ्यात ८ ते १० दिवसांनी स्प्रे. होतो. आता १५ ते २० दिवसाला स्प्रे घेतो. १२०० झाडांसाठी आतापर्यंत फवारणीचा १५ ते १६ हजार रू. आणि खतांचा व इतर ३० ते ३५ हजार रू. असा एकूण ५० हजार रू. २।। एकराला खर्च आला असून ५।। लाख रू. चे उत्पन्न मिळाले आहे.
तेल्याने कंटाळून डाळींबाखालील क्षेत्र 'सिद्धीविनायक' शेवग्याखाली
आमच्याकडे १४ - १५ एकर जमीन आहे. त्यातील १० -१०।। एकरमध्ये भगवा डाळींब आहे. २।। एकरमध्ये 'सिद्धीविनायक' शेवगा आणि १।। एकर चारा पिके आहेत. तसेच १६००० पक्षांचा पोल्ट्री फार्म आहे.
शेवगा लागवडीपूर्वी १२।। -१३ एकर डाळींब होते. मात्र गेली ४- ५ वर्षापासून आम्ही तेल्यारोगापासून प्लॉट रोगमुक्त ठेवण्यासाठी संधर्ष करीत होतो. यामध्ये फार धावपळ होत असे. अतिशय मेहनत (कष्ट) करूनही खात्रीशीर उत्पादन मिळेलच अशी खात्री नव्हती. यामध्येच २।। एकर १२' x ८' वरील डाळींब बाग काढून त्यामध्ये त्याच ठिबकवर वरील 'सिद्धीविनायक' मोरिंगा शेवग्याची १२' x ८' वर लागवड केली आहे.
शेवगा लागवडीस विरोध करणारी मुले म्हणतात अजून सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा लावायचा
डाळींब उत्पादन घेताना काही अडचण आल्यास श्री. ढगे यांचे प्रत्यक्ष प्लॉटवर येउन मार्गदर्शन होत असते, त्यामुळे त्यांचे आमच्याकडे येणे जाने होतेच आणि त्यांच्या सल्ल्यानुसारच हा शेवगा लावला आहे. शेवगा लागवडीस सुरुवातीस मुले विरोध करत होती. कारण आमच्या भागात असे म्हणतात, की जी शेतकरी शेवगा लावेल त्याची परिस्थिती कधीही सुधारणार नाही. नेहमी कर्जातच राहील. मात्र योग्य मार्गदर्शनाने व 'कृषी विज्ञान' मासिकातील प्रत्येक पानावरील वाक्य ' लावा शेतात सिद्धीविनायक शेवगा मोरिंगा । तुमच्या भोवती पैसा घालेल पिंगा ।।' याने मी प्रभावीत होऊन हा शेवगा लावला आहे आणि आता मुले म्हणतात, सरांचा 'सिद्धीविनायक' शेवगा अजून लावायचा. याचे कारण म्हणजे गेली १५ -२० वर्षातून आम्ही शेती करीत आहोत, मात्र कमी खर्चातील, कमी कष्टातील या शेवगा उत्पादनापासून २०१० -२०११ या वर्षासारखे समाधान कधीच मिळाले नाही. या शेवग्याच्या उत्पादनापासून आमचे संपूर्ण कुटुंब पुर्णता समाधानी झाले आहे.